प्रवासात असताना टायफॉइडचा संसर्ग टाळण्यासाठीच्या टिप्स

भारतामध्ये टायफॉइड ही अजूनही एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. 2023 मध्ये भारतात टायफॉइडचे 5 लाखांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले होते. आज अधिकाधिक भारतीय देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना टायफॉइड होऊ नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुमच्या पुढील प्रवासापूर्वी आणि प्रवासादरम्यान काही सोप्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्यास तुम्ही सुरक्षित राहू शकता.
टायफॉइड म्हणजे काय?
टायफॉइड साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्ग आहे. दूषित अन्न व पाण्यावाटे याचा प्रसार होतो आणि ताप, डोकेदुखी आणि पोटात तीव्र वेदना होणे ही याची सामान्यपणे आढळणारी लक्षणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार टायफॉइड ही भारतासारख्या दक्षिण आशियातील देशांमधील एक मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहे, जिथे कमकुवत स्वच्छतायंत्रणांमुळे याचा प्रसार होतो.
प्रवासात असताना टायफॉइडपासून सुरक्षित कसे राहावे?
टायफॉइडपासून वाचण्यासाठी तुम्ही खालील सोपे उपाय करू शकता :
- WASH प्रोटोकॉलचे पालन करा (पाणी, स्वच्छता, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता)
- खानपानाची काळजीपूर्वक निवड करा
- प्रवासाला निघण्यापूर्वी टायफॉइडवरील लस घ्या
1. WASH प्रोटोकॉल
प्रवास करताना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी काटेकोर पाळणे अत्यावश्यक आहे. स्वच्छतागृह वापरल्यानंतर आणि जेवण करण्याआधी हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवा. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल, तर 60% अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरू शकता.
2. खाण्यापिण्याची सुरक्षित निवड
- सॅलड, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अन्न टाळा.
- बुफेऐवजी गरम आणि ताज्या शिजवलेल्या अन्नाची निवड करा.
- न गाळलेलं पाणी टाळा. पाण्याच्या स्त्रोताबद्दल खात्री नसेल, तर उकळलेले किंवा बाटलीबंद पाणीच प्या.
- बर्फ शुद्ध पाण्यापासून तयार केल्याची तुम्हाला खात्री नसेल तर पेयामध्ये बर्फाचे तुकडे टाकणे टाळा. त्याऐवजी गरम पेये, स्वच्छतेची काळजी घेऊन तयार केलेले रस किंवा पॅकबंद पेये निवडा.
- पाश्चराइझ न केलेले दूध, दुग्धजन्य पदार्थ किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
- केळी, संत्री यांसारखी सोलता येणारी फळे किंवा नीट धुवून खाता येतील अशी फळे खा.
3. टायफॉइडवरील लस घ्या
टायफॉइडपासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दीर्घकालीन संरक्षणासाठी टायफॉइड संयुग लसी (TCVs) घेण्याची शिफारस केली आहे. प्रवासाच्या तारखेपूर्वी किमान दोन महिने आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लस घ्या.
लसीकरण खरेच आवश्यक आहे का?
होय. अगदी काळजीपूर्वक प्रवास करणाऱ्या व्यक्तींनाही टायफॉइडचा संसर्ग होण्याचा धोका असतो. लसीकरण केल्यास संसर्गाचा धोका तर कमी होतोच, त्याचप्रमाणे आजाराचा प्रसारही मर्यादित होतो. नैसर्गिक संसर्गामुळे दीर्घकालीन प्रतिकारशक्ती मिळत नाही, त्यामुळे टायफॉइडमधून बरे झालेल्या व्यक्तीसुद्धा पुन्हा संक्रमित होऊ शकतात आणि त्यांनी लस घेणे आवश्यक असते.
निष्कर्ष
टायफॉइड हा प्रतिबंध करता येण्यासारखा आजार आहे, तरीही तो आजही भारतात आणि जगभरात कोट्यवधी लोकांना प्रभावित करतो. देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास करताना योग्य खबरदारी घेतल्यास टायफॉइडपासून सहज बचाव करता येतो. स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे, अन्न निवडताना शहाणपणाने निर्णय घेणे आणि लस घेणे हे सगळे सोपे पण प्रभावी उपाय आहेत. स्वतःचे आणि आपल्या आजूबाजूच्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे उपाय नक्कीच करा. टायफॉइडमुळे तुमचा प्रवासावर विरजण पडू देऊ नका. आधीच नियोजन करा, सतर्क राहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या, म्हणजेच तुमचा प्रवास आनंददायक आणि चिंतामुक्त होईल.
स्रोत
अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.