टायफॉइडला प्रतिबंध करण्यासाठी लशीचा कसा उपयोग होतो?

सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा टायफॉइड आजार भारतात अजूनही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. टायफॉइडमुळे तीव्र ताप, अशक्तपणा आणि पोटदुखी होऊ शकते; काही गंभीर प्रकरणांमध्ये हा आजार जीवघेणाही ठरतो. या संसर्गावर उपचार करण्यासाठी पारंपरिकपणे अँटिबायोटिक्स वापरले जात असले, तरी अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) वाढल्यामुळे उपचार अधिक कठीण झाले आहेत. स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी सुधारल्यास टायफॉइड टाळण्यास मदत होतेच, पण आजही लसीकरण हा या आजारापासून संरक्षण मिळवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
कोणत्या प्रकारच्या टायफॉइडच्या लसी उपलब्ध आहेत?
भारतात, टायफॉइडवरील दोन प्रकारच्या लसी उपलब्ध आहेत :
- व्हीआय कॅप्सुलर पॉलसॅक्कराइड (व्हीआय-पीएस) लस
- टायफॉइड कॉन्ज्युगेट लस (टीसीव्ही
व्हीआय कॅप्सुलर पॉलसॅक्कराइड (व्हीआय-पीएस) लस
व्हीआय-पीएस लसीमध्ये सॅल्मोनेला टायफी या जीवाणूच्या रोगकारक घटकातील शुद्ध अॅंटिजेनिक अंश असतो. या लशीचा एकच डोस दिला जातो आणि पहिल्या वर्षात सुमारे 61% संरक्षण प्रदान करते. मात्र, कालांतराने या लशीचा प्रभाव कमी होत जातो. त्यामुळे दर तीन वर्षांनी पुन्हा लस घेणे आवश्यक असते. फक्त 2 वर्षांवरील मुलांसाठी या लशीची शिफारस करण्यात येते. नवजात बाळांना ही लस दिली जात नाही. कारण त्यांच्यामध्ये आवश्यक रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होत नाही.
व्हीआय कॅप्सुलर पॉलसॅक्कराइड कॉन्ज्युगेट लस (टीसीव्ही)
व्हीआय-पीएस लशीच्या मर्यादा दूर करण्यासाठी व्हीआय-पॉलिसॅक्कराइड अँटिजेन एका वाहक प्रथिनाशी संलग्न करण्यात आले आहेत, ज्यामुळे लसीची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अशा प्रकारे तयार झालेल्या टायफॉइड कॉन्ज्युगेट लसी (टीसीव्ही) 6 महिन्यांच्या बाळांपासून ते 65 वर्षांपर्यंतच्या प्रौढांनाही देता येतात. या लसी दीर्घकालीन प्रतिकारशक्ती प्रदान करतात. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतासारख्या टायफॉइडप्रवण देशांतील 6 महिन्यांपासून 23 महिन्यांपर्यंतच्या मुलांसाठी टीसीव्ही लसींची शिफारस करण्यात आली आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने 6 महिन्यांपासून नियमित लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्याची शिफारस केली आहे. तसेच, 9 महिन्यांपासून गोवर असलेल्या लसींसोबत (जसे एमआर किंवा एमएमआर) एकत्रितपणे ही लस देण्याची शिफारसही केली आहे. जर ही लस याआधी दिली गेली नसेल, तर ती 65 वर्षांपर्यंतच्या वयापर्यंत कधीही दिली जाऊ शकते.
लसीकरण महत्त्वाचे का आहे?
टायफॉइडचा प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी महत्त्वाच्या असतात. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वेळ लागतो. टायफॉइडच्या तापामुळे होणारी आजारी पडण्याची शक्यता आणि मृत्यूदर लक्षात घेता, विशेषतः सध्या वाढत चाललेल्या अँटिमायक्रोबियल रेझिस्टन्सच्या पार्श्वभूमीवर, टायफॉइडच्या लसीकरणाची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची ठरते.
अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्स (एएमआर)
टायफॉइडचा उपचार दिवसेंदिवस कठीण होत चालला आहे, कारण हा आजार निर्माण करणारे जीवाणू सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या अँटिबायोटिक्सना आता प्रतिसाद देत नाहीत. अलीकडील काळात एक्स्टेन्सिव्हली ड्रग-रेसिस्टंट (एक्सडीआर) टायफॉइडचे प्रकार उदयास आले आहेत. त्यामुळे शक्तिशाली अँटिबायोटिक्सवरही या जीवाणूंवर परिणाम करत नाहीत. सध्या अझिथ्रोमायसिन हे अशा परिस्थितीत उरलेले तोंडावाटे घेण्याच्या मोजक्या औषधांपैकी एक औषध आहे. परंतु दक्षिण आशियात अझिथ्रोमायसिनला प्रतिकार करणारे टायफॉइडचे प्रकार आधीच नोंदवले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात टायफॉइडवर इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या अधिक तीव्र औषधांशिवाय उपचार शक्य होणार नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
टायफॉइडच्या लसी अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्सविरुद्ध लढा देऊ शकतात का?
अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्सवर मात करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग म्हणजे टायफॉइडचा संसर्ग होण्यापूर्वीच त्याचा प्रतिबंध करणे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणून टायफॉइड कॉन्ज्युगेट लसींची (टीसीव्ही) शिफारस केली आहे. या लसींमुळे टायफॉइडचे रुग्ण कमी होऊन अँटिबायोटिक्सचा वापर कमी होतो. परिणामी, औषधप्रतिरोधक जीवाणूंचे प्रकार निर्माण होण्याचा वेग कमी होतो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यास मोठ्या साथी रोखता येतात, समाज सुरक्षित राहतो आणि एकूणच सार्वजनिक आरोग्य सुधारते.
तात्पर्य
भारतामध्ये टायफॉइड अजूनही एक गंभीर आरोग्य धोका म्हणून अस्तित्वात आहे. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी आणि अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्सचा प्रसार कमी करण्यासाठी लसीकरणासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अत्यंत प्रभावी ठरतात. स्वच्छता आणि स्वच्छतेतील सुधारणा महत्त्वाच्या असल्या तरी, टायफॉइडचा धोका पूर्णपणे टाळण्यासाठी त्या पुरेशा ठरत नाहीत. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने शिफारस केलेल्या टायफॉइड कॉन्ज्युगेट लसी (टीसीव्ही) दीर्घकालीन संरक्षण देतात आणि त्या लहान बाळांनाही देता येतात. लसीकरणाची व्याप्ती वाढवून आपण टायफॉइडचं प्रमाण कमी करू शकतो, अँटिबायोटिक्सचा वापर मर्यादित ठेवू शकतो आणि औषध-प्रतिरोधक प्रकार निर्माण होण्याला प्रतिबंध करू शकतो.
स्रोत
अस्वीकृती: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.