वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न
लक्षणे
टायफॉइड तापाची सामान्य लक्षणे कोणती आहेत?
टायफॉइडची सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे सततचा ताप जो दिवसागणिक वाढत जातो, डोकेदुखी, तीव्र अशक्तपणा, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणे.[1]
संसर्ग झाल्यानंतर किती दिवसांनी लक्षणे दिसतात?
संसर्ग झाल्यानंतर टायफॉइडची लक्षणे दिसण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणे 3 दिवसांत दिसू शकतात, तर काहींमध्ये लक्षणे दिसण्यास 2 महिने लागू शकतात.[2]
टायफॉइड तापामुळे आरोग्याच्या दीर्घकालीन समस्यांचा धोका असतो का?
उपचार न झाल्यास टायफॉइड तापामुळे आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये आतड्यांमध्ये रक्तस्राव होणे किंवा छिद्र पडणे यांचा समावेश होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये हा संसर्ग मेंदूसह इतर अवयवांवरही परिणाम करू शकतो.[3,4]
टायफॉइड ताप येणे हे अन्नातून विषबाधा होण्यासारखेच असते का?
टायफॉइड ताप सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो, जो अन्नावाटे पसरू शकतो. पण हा अन्नातून होणाऱ्या विषबाधेसारखा साधा त्रास नाही. टायफॉइड हा जीवघेणा ठरू शकणारा आजार आहे. या आजारावर वेळेत आणि योग्य अँटिमायक्रोबियल औषधांनी उपचार होणे गरजेचे असते. या आजाराला वॉश प्रोटोकॉल आणि लसीकरणाद्वारे याचा प्रतिबंध करता येतो. अन्नातून होणारी विषबाधा बहुतेक वेळा एका आठवड्यात बरी होते.[5,6]
टायफॉइडवर उपचार न केल्यास काय गुंतागुंत निर्माण होऊ शकते?
वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास टायफॉइड ताप एका आठवड्यात बरा होतो. पण उपचार न केल्यास लक्षणे वाढतात आणि रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. अशा रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी काही आठवडे किंवा महिनाही लागू शकतो.[1]
टायफॉइडची शंका आल्यास डॉक्टरांकडे कधी जायचे?
तुम्हाला टायफॉइड आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लक्षणे कायम राहिली किंवा वाढू लागली, तर रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासू शकते.[7,8]
प्रतिबंध
टायफॉइडला प्रतिबंध कसा करता येतो?
लस घेण्यासोबतच, वारंवार हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे हे टायफॉइडपासून संरक्षण करण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत. तुमच्यासाठी योग्य लस कोणती हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
टायफॉइडच्या प्रतिबंधासाठी हात धुणे इतके महत्त्वाचे का आहे?
शुद्ध न केलेल्या पाण्यामुळे टायफॉइड होऊ शकतो का?
होय. निर्जंतुक न केलेले किंवा सॅल्मोनेला टायफी या जीवाणूंमुळे दूषित झालेले पाणी प्यायल्यास टायफॉइड होण्याची जोखीम वाढते.[5]
टायफॉइडला प्रतिबंध करण्यासाठी घरी स्वच्छतेचे कोणते नियम पाळावेत?
टायफॉइडचा धोका कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या खालील सवयी लावून घ्या –
- गरम पाणी आणि साबणाने वारंवार हात धुवा
- शुद्ध न केलेले/न गाळलेले पाणी पिणे टाळा.
- तुमचे सगळे अन्न व्यवस्थित शिजल्याची खात्री करा
- कच्ची फळे आणि साल न काढता येणाऱ्या भाज्या टाळा
- लसीकरणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.[10]
टायफॉइडचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या सामान्य सपर्काने टायफॉइडचा फैलाव होऊ शकतो?
नाही, टायफॉइड ताप संक्रमित व्यक्तीच्या थेट किंवा साध्या संपर्कातून पसरत नाही. पण जर त्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूंशी तुम्ही संपर्कात आलात, विशेषतः त्यांनी स्वच्छतागृह वापरल्यानंतर हात धुतले नसतील, तर तुम्हालाही टायफॉइड होण्याचा धोका असतो.[11]
सुयोग्य स्वच्छतेमुळे टायफॉइडचा संसर्ग कमी होण्यास कशी मदत होते?
टायफॉइडसाठी कारणीभूत ठरणारे जीवाणू मानवाची विष्ठा आणि लघवीद्वारे पसरतात. ज्या भागात स्वच्छतेची सुविधा कमी आहे, तिथे संक्रमित मानवी मलमूत्रामुळे पाण्याचा स्रोत दूषित होऊ शकतो. असे पाणी पिणाऱ्यांना किंवा त्यात धुतलेले अन्न खाणाऱ्यांना टायफॉइड होऊ शकतो.[5]
टायफॉइडला प्रतिबंध करण्यात अन्नपदार्थ निर्जंतुक असणे किती महत्त्वाचे असते?
सॅल्मोनेला टायफी हे जीवाणू अन्नपदार्थ किंवा पाण्यावाटे पसरू शकतात. म्हणून अन्नपदार्थ निर्जंतुक राखण्याच्या सवयी लावून घेणे आवश्यक आहे. खालील गोष्टींचे पालन केल्यास टायफॉइडचा धोका कमी करता येतो –
[11]
- तुम्हाला टायफॉइडचा संसर्ग झाल्यास इतरांसाठी स्वयंपाक करू नका.
- स्वयंपाक करण्यापूर्वी, केल्यानंतर आणि जेवणाच्या आधी व नंतर हात नीट साबणाने धुवा.
- अन्न तयार करताना स्वयंपाकघरातील सर्व पृष्ठभाग आणि भांडी व्यवस्थित स्वच्छ करा.
- प्रवासात असताना, स्वच्छतेविषयी खात्री नसेल, तर उष्ण तापमानावर शिजवलेले अन्न किंवा पॅकबंद अन्नपदार्थच खा.
- शुद्ध न केलेले पाणी किंवा बर्फ वापरलेले पेय पिऊ नका.
- पाण्याच्या शुद्धतेविषयी खात्री नसेल तर उकळलेले किंवा बाटलीबंद पाणी पिणेच सुरक्षित असेल.
निदान आणि उपचार
टायफॉइड तापाचे निदान कसे करतात?
टायफॉइड तापाचे निदान करण्यासाठी रक्त, विष्ठा, लघवी किंवा बोन मॅरोच्या नमुन्यांची तपासणी करतात.[12]
टायफॉइडसाठी सामान्य उपचार काय असतात?
टायफॉइडवरील सर्वात सामान्य उपचार म्हणजे डॉक्टरांनी दिलेले अँटिबायोटिक औषधांचा कोर्स. योग्य उपचार घेतल्यास काही दिवसांत लक्षणांमध्ये सुधारणा होऊ लागते. घरी चांगला आहार घ्यावा व पुरेशी झोप घ्यावी आणि भरपूर द्रवपदार्थ घ्यावे.[13] आजच लस घ्या, जेणेकरून टायफॉइड होण्याची शक्यता कमी होईल.
टायफॉइडमधून बरे होण्यासाठी अँटिबायोटिक औषधे घ्यावी लागतात का?
होय, टायफॉइडमधून बरे होण्यासाठी अँटिबायोटिक औषधे अत्यावश्यक असतात. बहुतांश रुग्णांना 10 ते 14 दिवसांचा पूर्ण कोर्स करावा लागतो. औषध घेतल्यापासून 6 ते 7 दिवसांत लक्षणांमध्ये सुधारणा जाणवते, पण डॉक्टरांनी सांगितलेला संपूर्ण कोर्स पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असते.[13]
टायफॉइडमधून पूर्ण बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?
टायफॉइडच्या उपचाराला सुरुवात केल्यानंतर काही दिवसांत आराम वाटू लागतो. ताप पूर्णपणे उतरायला सुमारे 10 दिवस लागू शकतात. मात्र, थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यासाठी त्याहून अधिक वेळ लागू शकतो. जर गुंतागुंत झाली किंवा आजार पुन्हा बळावला, तर बरे होण्यास अधिक काळ लागतो.[11]
टायफॉइडवर घरी उपचार करता येतात का, की रुग्णालयात दाखल होणे गरजेचे असते?
टायफॉइडचे वेळेवर निदान झाल्यास अँटिबायोटिक औषधांनी घरच्या घरी उपचार करता येतो. पण लक्षणे तीव्र असतील किंवा गुंतागुंत निर्माण झाली असेल, तर रुग्णालयात दाखल होणे आवश्यक ठरते.[13]
टायफॉइडमधून बरे होत असताना काय खावे आणि प्यावे?
टायफॉइड तापातून बरे होत असताना नियमितपणे आहार घेणे आणि भरपूर पाणी व इतर द्रवपदार्थ पिणे अत्यंत आवश्यक असते. दिवसातून तीन मोठ्या जेवणांऐवजी थोड्या थोड्या अंतराने थोडा आहार घ्या. अन्न ताजे शिजवलेले आणि गरम असावे. कच्चे, अर्धवट शिजवलेले किंवा सामान्य तापमानावरील पदार्थ टाळावेत. [10,13]
लसीकरण
टायफॉइडसाठी कोणत्या प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत?
टायफॉइड तापासाठी दोन प्रकारच्या लशी उपलब्ध आहेत – [14]
- टायफॉइड कॉन्ज्युगेट लस
- Vi पॉलिसॅकराइड लस
टायफॉइड लसीचे संरक्षण किती काळ टिकते?
प्रत्येक लशीची संरक्षण देण्याची क्षमता वेगवेगळी असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), TCV लस सर्व वयोगटासाठी अधिक प्रभावी मानली जाते. कारण ती लहान मुलांसाठी योग्य असून दीर्घकाळ टिकणारे संरक्षण देते.[14] टायफॉइड लसीकरणाबाबत अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
टायफॉइड लसीचे काही साइड-इफेक्ट्स असतात का?
या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसतात. काहींना इंजक्शनची सुई टोचलेल्या जागेवर सौम्य वेदना, सूज किंवा थोडा ताप जाणवू शकतो.[15]
टायफॉइडवरील लस मुलांसाठी सुरक्षित आहे का?
TCV लस ही लहान मुलांसाठी सर्वाधिक सुरक्षित मानली जाते, कारण ती 6 महिन्यांपासून देता येऊ शकते. Vi-PS लस 2 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या मुलांना देता येऊ शकते.[15]
टायफॉइडची लस मला कुठे घेता येईल?
टायफॉइडची लस घेण्यासाठी आजच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
प्रवासात असताना घ्यावयाची काळजी
टायफॉइडचा धोका जास्त असलेल्या भागात प्रवास करताना कोणते अन्नपदार्थ टाळावे?
प्रवासादरम्यान कच्ची फळे व भाज्या, विशेषतः जी न धुता किंवा न सोलता येणारी आहेत, ती टाळा. सुरक्षित नसलेले मासे किंवा तत्सम सीफूड, कच्ची अंडी आणि पाश्चराइझ न केलेले दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ टाळा. न गाळलेले पाणी पिऊ नका आणि बर्फ न घातलेल्या पेयांसाठी विचारणा करा.[10]
प्रवासात पिण्याच्या निर्जंतुक पाण्याची खात्री कशी करावी?
प्रवासात फक्त उकळलेले बाटलीबंद किंवा मिनरल वॉटर प्या.[10]
प्रवासात रस्त्यावरील अन्न खाणे सुरक्षित आहे का?
प्रवासात रस्त्यावरील अन्न टाळणेच हिताचे राहील. गरज भासल्यास थंड किंवा कच्च्या अन्नाऐवजी ताजे, वाफाळते गरम अन्न प्राधान्याने खा.[10]
प्रवासादरम्यान कोणत्या स्वच्छतेच्या सवयी पाळाव्यात?
हात वारंवार धुवा. स्वतःसोबत साबण ठेवा आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच जेवणाआधी हात धुवा. साबण नसेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता.[10]
प्रवासात टायफॉइडची लक्षणे दिसू लागल्यास काय करावे?
प्रवासादरम्यान जर तब्येत बिघडली आणि टायफॉइडसारखी लक्षणे जाणवू लागली, तर लस घेतलेली असली तरी शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.[1]
प्रवासानंतर टायफॉइड घरात येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
प्रवासानंतर टायफॉइडचा धोका घरात येऊ नये यासाठी वैयक्तिक स्वच्छतेची नीट काळजी घ्या. हात वारंवार धुवा, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अन्नपदार्थ व गाळून न घेतलेले पाणी वापरून केलेली पेये टाळा. ज्या भागांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छ पाण्याची सुविधा अपुरी आहे, तिथे प्रवास करत असाल, तर प्रवासापूर्वी लस घेणेही अत्यावश्यक आहे.[13,10, 16]
स्रोत
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/symptoms/
- https://www.emro.who.int/health-topics/typhoid-fever/introduction.html
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/complications/
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/typhoid-fever/symptoms-causes/syc-20378661
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/causes/
- https://www.nhs.uk/conditions/food-poisoning/
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/typhoid-fever/symptoms-causes/syc-20378661#when-to-see-a-doctor
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/treatment/
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/typhoid-fever/symptoms-causes/syc-20378661#causes
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/typhoid-fever/symptoms-causes/syc-20378661#prevention
- https://my.clevelandclinic.org/health/diseases/17730-typhoid-fever
- https://www.mayoclinic.org/diseases-conditions/typhoid-fever/diagnosis-treatment/drc-20378665
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/treatment/
- https://www.who.int/teams/immunization-vaccines-and-biologicals/diseases/typhoid
- https://www.who.int/groups/global-advisory-committee-on-vaccine-safety/topics/typhoid-vaccines
- https://www.nhs.uk/conditions/typhoid-fever/vaccination/
अस्वीकृती : भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड यांच्यातर्फे एक जनजागृती उपक्रम. ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे व वैद्यकीय सल्ला मानली जाऊ नये. येथे दाखवलेले डॉक्टर, वैद्यकीय सुविधा आणि ग्राफिक्स केवळ उदाहरणासाठी दाखवले गेले आहेत. कोणताही वैद्यकीय सल्ला, प्रश्न किंवा आपल्या स्थितीबद्दलची शंका असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.